Monday, July 1, 2013

kosumb

बारभाई कारस्थान
-प्र.ल. सासवडकर

उत्तर पेशवाईत रघुनाथरावाने अन्यायाने पेशवेपद मिळविण्यासाठी केलेला प्रयत्न अयश्स्वी करणाऱ्या मराठी सेनानी व मुत्सद्दी यांचा संघ. नारायणरावाच्या वधानंतर पेशवाई मिळविण्यासाठी रघुनाथरावाने केलेल्या कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी प्रामुख्याने हा स्थापन झाला. बारभाई म्हणजे बारा माणसांचे मंडळ असे नसून काही एका हेतूने एकत्र जमलेला समूह होता. बारभाई मंडळ स्थापन झाले, तेव्हा त्यात सखाराम बापू, भगवंत बोकील, बाळाजी जनार्दन उर्फ नाना फडणीस, त्रिंबकराव पेठे, हरिपंत फडके, मालोजी घोरपडे, महादजी शिंदे, तुकोजी होळकर ही प्रमुख मंडळी होती. रघुनाथरावाला पदच्युत करून नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हिच्या नावाने कारभार करावा; तिला मुलगा झाला तर त्यास, नाही तर दत्तक घेऊन त्याच्या नावाने कारभार करावा, असे सुरुवातीस कारस्थान ठरले. यालाच बारभाई कारस्थान म्हणतात. सखाराम बापू व नाना फडणीस हे कारभारी आणि त्रिंबकराव पेठे यांच्याकडे फौजेची अखत्यारी ठेवावी असे ठरले. पार्वतीबाई आणि गंगाबाई यांना मारण्याचा कट उघडकीस येताच सखारामबापू नाना फडणीस, हरिपंत फडके यांनी गंगाबाईला पुण्याहून १७ जानेवारी १७७४ रोजी पुरदंरच्या किल्ल्यावर नेले आणि तिच्या नावाने कारभार सुरू केला. त्यामुळे रघुनाथराव व बारभाई संघ असा उघड सामना सुरू झाला. यातूनच २६ मार्च १७७४ रोजी कासेगावची लढाई झाली. यात त्रिंबकराव पेठे मरण पावले आणि रघुनाथरावाला बऱ्हाणपूरकडे जाण्यास संधी मिळाली. १८ एप्रिल १७७४ रोजी गंगाबाईला मुलगा झाला. त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात येऊन १८ मे १७७४ रोजी त्याला पेशवाईची वस्त्रे देण्यात आली. यानंतर बारभाईत मोरोबादादा फडणीस, भगवानराव प्रतिनिधी, बाबूजी नाईक, परशुरामभाऊ पटवर्धन, भोसले इ. मंडळींचा समावेश करण्यात आला. रघुनाथराव आणि बारभाई यांच्यात बरेच वर्षे संघर्ष चालू होता. रघुनाथरावाने इंग्रजांशी तह करून त्यांचा आश्रय घेतला .रघुनाथरावाला ताब्यात घेण्यासाठी बारभाईनी इंग्रजांशी १ मार्च १७७९ रोजी पुरंदरचा तह केला.

रघुनाथरावाशी संपूर्णपणे वाकडे धरू नये, असे तुकोजी होळकर, मोरोबादादा फडणीस आणि सखारामबापू यांना वाटत होते. यातूनच बारभाईत मतभेद वाढू लागले. सखारामबापू आणि मोरोबादादा फडणीस यांनी पेशवाईचा मालक सवाई माधवराव पण रघुनाथरावाने वडिलकीच्या नात्याने कारभार करावा, असा बेत करून १७७८ च्या मार्चमध्ये पुणे ताब्यात घेतले; पण महादजी शिंदे फौजेनिशी पुण्यास येऊन दाखल झाले व मोरोबाच्या कटाची इतिश्री झाली; मोरोबास कैद करून पुढे १८०० पर्यंत तुरूंगात ठेवण्यात आले. याच सुमारास मुंबई कौन्सिलने पुरंदर तहाच्या विरूद्ध कंपनीच्या संचालकांकडे तक्रार करून युद्ध चालू ठेवण्याचा हुकूम मिळविला. रघुनाथरावाला घेऊन कंपनीची छोटी फौज पुण्याच्या दिशेने निघाली. तळेगावजवळ तिला वेढण्यास येऊन वडगावचा अपमानकारक करार १३ जानेवारी १७७९ रोजी मान्य करावा लागला. यावेळी सखारामबापूंचा शत्रूपक्षाशी झालेला पत्रव्यवहार उघडकीस आला आणि बापूंना कैद झाली. नाना फडणीसांना सर्वाधिकार प्राप्त झाले. पुढे कलकत्त्याहून सेनापती टॉमस गोडार्डच्या हाताखाली दुसरी फौज सुरतला येऊन दाखल झाली. युद्धास पुन्हा तोंड फुटले आणि १७८२ च्या मे महिन्यात सालबाईच्या तहाने ते थांबले. रघुनाथरावास सालिना तीन लाख रु. देऊन त्याने कोपरगावी रहावे असे ठरले.

No comments:

Post a Comment